कल्याण-डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीचा आराखडा केडीएमसीने तयार केला आहे. जानेवारीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर हीच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे.
डोंबिवली- कचरा ही जगातील सर्वच शहरांची सर्वात मोठी समस्या आहे. ती कायमची निकालात काढण्यासाठी राज्याच्या सुवर्ण नगरोत्थान महाअभियानांतर्गत 43 कोटी 75 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीचा आराखडा केडीएमसीने तयार केला आहे. जानेवारीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर हीच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे.
महापालिका क्षेत्रातदररोज 550 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा सर्व कचरा कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. त्याची क्षमता संपली असूनही गेल्या अनेक वर्षापासून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीचा त्रास कल्याणकरांना सहन करावा लागत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्य सरकारला पालिकेकडून 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के कर्ज मिळणार आहे. यात कचऱ्याची दोन भागांत विभागणी करण्यात येईल. कचरा गोळा करून वाहतूक करणं व कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणं, असे हे टप्पे असतील. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून दहा कोटींचं अनुदान मिळालं आहे. त्यात प्रत्येक वॉर्डासाठी एक मिनी टिपर अशा एकूण 70 गाडय़ा, 10 डंपर प्लेसर, 22 मिनी कॉम्पॅक्टर, एक वॉशिंग टँकर, कचरा उचलण्याच्या 22 गाडय़ा अशा कचरा वाहून नेणाऱ्या एकूण 125 नवीन गाडय़ा महापालिकेत दाखल होणार आहेत.



